कोकणामध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळेल आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल अशी चिन्हे दिसत होती. परंतु, स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांकडून प्राप्त माहितीनुसार, गणपतीपुळे पर्यटन स्थळ शुक्रवारी नवीन वर्षाच्या निमित्ताने अतिशय तुरळक गर्दी दिसून आली.
शासनाने ख्रिसमस, न्यू इअर आणि ओमीक्रोन विषाणूच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केल्यानंतर येथे आलेल्या बऱ्याच पर्यटकांनी केवळ देवदर्शनाचा लाभ घेऊन परतीचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र समोर आले आहे. दरवर्षी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. परंतु गेल्या दीड वर्षात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरूच असल्याने या तीर्थक्षेत्रात पर्यटकांची संख्या कमी प्रमाणात दिसून येत आहे त्यातच पर्यटन क्षेत्राला शासनाने परवानगी दिल्यानंतर या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असे चित्र निर्माण झाले होते.
त्यातील दिवाळी पर्यटनाचा हंगाम मागील वर्षाच्या मानाने चांगल्या प्रकारचा गेल्यावर ख्रिसमस पर्यटन हंगामामध्ये सुद्धा पर्यटन व्यवसायाला गती मिळेल अशी आशा येथील सर्वच लहान मोठ्या पर्यटन व्यावसायिकांनी होती. नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांच्या गर्दीचा फायदा स्थानिक व्यवसायिकांना होणार असे चित्र दिसत असतानाच जिल्हा शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागल्याचे चित्र समोर आले आहे.
जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी सुद्धा शुक्रवारी कमी प्रमाणात गर्दी दिसून आल्याने स्थानिक व्यवसायिकांची पूर्णता निराशा झाली, आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लागू झाल्याने पर्यटकांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे चित्र दिसून येत आहे.