मागील दोन वर्षे पूर्णत: महागाईमध्ये आणि कोरोनाच्या उद्रेकामध्येच गेले. नवीन वर्षामध्ये महागाई काही तरी प्रमाणात कमी होईल अशी आशा सामान्य जनता ठेवून आहे. इंधन, घरगुती साधनापासून ते सर्वच वस्तुंमध्ये महागाई वाढल्याने सामान्य जनता होरपळून निघत आहे. त्यात एक दिलासाजनक बातमी इंडियन ऑइलने ग्राहकांसाठी दिली आहे.
इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये सध्या तरी कोणताच बदल झालेला नाही. डिसेंबर महिन्यामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सुद्धा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये अद्याप वाढ करण्यात न आल्याने, जनतेसाठी नक्कीच हि दिलासादायक बाब आहे.
३१ डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना १९ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी २०५१ इतके रुपये द्यावे लागत होते. नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये कपात केल्याने, केवळ १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर ही कपात करण्यात आली आहे. चेन्नईत आता १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी २१३१ रुपये आणि दिल्लीमध्ये १९९८.५ इतके रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन किंमती जाहीर झाल्यानंतर, कोलकतामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर २०७६ रुपयांना खरेदी करता येणार आहे.
इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना सरप्राईज म्हणून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे गुड न्यूजच दिली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने मागील दोन वर्ष नुकसानीत असणाऱ्या रेस्टॉरंट चालकांना दिलासा मिळाला आहे.