मागील काही महिन्यांपासून दापोली आणि लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या वाळू उपसा केला जात आहे. स्थानिकांनी अनेक वेळा महसूल विभागाकडे या संदर्भात तक्रार केली असून सुद्धा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. उलट “चोर सोडून संन्यासाला फाशी” या म्हणीप्रमाणे तिथे राजरोस बेकायदेशीर रित्या वाळू उपश्याचे काम सुरु आहे.
दापोलीत बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे, हे दापोली तालुक्यात आणि शहरात पडत असलेल्या वाळूच्या ढिगार्यावरून निदर्शनास येत आहे. हा बेकायदेशीर उपसा करत असलेल्या वाळू माफियांवर कारवाई करण्याऐवजी, ज्या ठिकाणी वाळू पडली आहे, त्या मालकांकडेच वाळूच्या पावत्या मागण्यासाठी दापोली शहरात महसूल विभाग सक्रीय होऊन चौकशी करत आहे.
दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू विक्री होत आहे. दापोली शहरात आणि तालुक्यात वाळूचे ढीगच्या ढीग पडलेले दिसत आहेत. दिवसा ढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक
दापोलीत होत असताना, महसूल विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचे दिसत असल्याबाबत नागरिक आश्चर्य आणि नाराजगी व्यक्त करत आहेत. दापोली शहरात ही वाळू कधी पडली याचा शोध महसूल कर्मचारी घेत आहेत आणि ज्यांच्या परिसरात वाळूचे ढीग आहेत, त्यांच्याकडून खरेदी केल्याच्या पावत्या मागू लागले आहेत.
ज्या ठिकाणी वाळू पडत आहे ते बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्यावर कारवाई करण्यास दापोली महसूल विभाग पुढे येत नाही. मात्र याच ठिकाणी जर एखादा सामान्य नागरिक असेल तर मात्र त्यांच्यावर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई आणि तीही त्वरित करण्यात आली असती. महसूल विभागाच्या डोळ्यादेखत याच बेकायदेशीर वाळूने बांधकाम सुरू आहे. दापोली महसूल विभागाच्या या दुटप्पी धोरणामुळे दापोली तालुक्यातील सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.