सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक उलाढाली झाल्या. या निवडणुकीत भाजप पॅनलचा विजय झाला असून नारायण राणे यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर खोचक टीका केली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष-उपाध्यक्ष ११ विरुद्ध ७ मतांनी निवडून आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अनेक मोठ मोठी लोक आली आणि अक्कल सांगायला लागली होती, त्यांना आज निकाल जाहीर झाल्यावर नक्कीच अक्कल मिळाली असेल. अनेकानी बँकेचे स्वतःसाठी फायदे घेतले. मात्र यापुढे जिल्हा बँकेचा कारभार शेतकरी, मजूर, युवा वर्ग, बेरोजगार गोरगरीब गरजू यांच्यासाठीच करायचा आहे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची गुरूवारी निवडणूक झाली. यामध्ये बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी नितेश राणे बँकेत दाखल झाले आहेत. तब्बल १८ दिवासानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर येऊन जनतेसमोर हजर झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून नितेश राणे दूर होते. मात्र, १८ दिवसानंतर त्यांनी बँकेमध्ये हजेरी लावल्यानंतर चर्चेला एक प्रकारे उधाण आलं आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणी त्यांच्यावर अटकपूर्व जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. परंतु ही सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने सोमवारपर्यंत नितेश राणेंना मोठा दिलासा दिला आहे. सुनावणी सुरु असे पर्यंत त्यांना अटक होणार नाही, त्यामुळे आज ते अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. त्या दिवशी न्यायालयाची वेळ संपल्यामुळे, १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली असून याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.