कोकण म्हटलं कि, डोळ्यासमोर दिसते ते निसर्गाच्या सौंदर्याची केलेली लयलूट. कोकणाला निसर्गाची भरभरून देणगी मिळालेली आहे. कोकणाकडे पर्यटक जास्तीत जास्त आकर्षित होऊन येण्यासाठी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. अधिक प्रमाणात पर्यटक कोकणच्या सफारीला येऊन येथील पर्यटन व्यवसायाला उभारी मिळेल.
त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकांवर हिरवीगार झाडांची लागवड करून रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये चार चांद लागणार आहेत. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे आणि त्यातून होणारी विविध प्रकारच्या वाहनांची ये-जा हि संकल्पनाच मनाला सुखद गारवा देणारी आहे. आणि लवकरच असे चित्र रत्नागिरीकरांना पहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. या संकल्पनेला “सिग्नेचर रोड” असे म्हणतात.
रत्नागिरीमध्ये सिग्नेचर रोड दोन टप्प्यात साकारण्यात येणार असून पहिल्या टप्यात साळवीस्टॉप ते मांडवीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा झादांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच दुभाजकांवरही सुशोभित आणि शोभिवंत विविध रंगांच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्यामध्ये हातखंबा ते साळवीस्टॉप दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत.
त्यामुळे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यावर रत्नागिरीचे प्रवेशद्वार हातखंबा ते थेट मांडवी दरम्यानचा रस्ता सिग्नेचर रोड म्हणून ओळखला जाणार आहे. आजूबाजूला हिरवीगार विविध प्रकारची झाडे आणि त्यामधून जाणारा रस्ता हि रत्नागिरीची नवी आणि विशेष ओळख बनणार आहे. या सिग्नेचर रोड संकल्पनेसाठी सीएसआरमधील निधीतून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिली आहे. तसेच संकल्पना नवीन अवलंबत असल्याने त्याकरीता लागणारे मार्गदर्शन आणि मदत तज्ञ मंडळींकडून घेण्यात येणार आहे.