रेल्वे सेवा कोरोना काळानंतर सुरळीत सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विनातिकीट प्रवास, चोरीचे गुन्हे, फसवणूक या गोष्टी पुन्हा उदयास येऊ लागल्या आहेत. त्यामध्ये गुन्हा करून सुद्धा प्रवाशांची अरेरावी सुद्धा वाढल्याचे अधिक प्रमाण दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीचे शासकीय काम करत असतानाच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मारहाण झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
कृष्णाजीराव नागेश्वरराव वय ५३, रा. पडवेवाडी कुवारबाव, मिरजोळे, रत्नागिरी हे नेत्रावती एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळी संशयित आरोपी आरिफ समीर खान वय. १९, रा. के. सी. जैन नगर, मारुती मंदिर रत्नागिरी हा गेट नंबर २ ने बाहेर जाताना दिसला. त्यामुळे टिसीनी त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली असता, तो त्यांच्यावर मोठ मोठ्याने ओरडू लागला. माझ्याकडे तिकीट नाही असे म्हणू लागला, त्यावेळी या विनातिकीट प्रवाशाला टीसी नागेश्वरराव यांनी कमरेला पकडून टीसी कार्यालयाकडे नेत असताना खान याने ढक्काबुक्की करून टीसीच्या शर्टचा खिसा फाडला आणि त्यांच्या गळ्यातील चेन तोडून आर्थिक नुकसान केले.
परंतु, तरीही टीसी नागेश्वरराव यांनी त्याला पकडून ठेवले. तरीही खान याची बेशिस्त वर्तणूक सुरूच होती. अखेर नागेश्वरराव यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात संशयित आरिफ खान याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई पोलिसांमार्फत सुरु आहे.