एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेला बेमुदत संप ३ महिने पूर्ण होत आले तरी अजून संपुष्टात येण्याचे नाव घेत नाही आहे. कर्मचार्यांसोबत इतर जनता सुद्धा वाहतूक बंद असल्याने त्रस्त झाली आहे. खाजगी वाहनाचा खर्च सर्व बाजूने परवडणारा नसून, एसटीची ग्रामीण भागापर्यंत जाणारी एसटी मात्र आज पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता जनतेकडूनच एसटी लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी एसटी कर्मचार्यांना जनतेच्या हितासाठी तरी आता एसटी कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले आहे. एसटी कर्मचार्यांचा गेले तीन महिने संप चालू असल्याने त्याचा आर्थिक, मानसिक व शारिरीक फटका जनतेला बसला आहे.
प्रवासी जनता आहे, म्हणून त्यांच्या सेवेसाठी आपण आहोत याची जाणीवच संपकर्यांना उरलेली नाही, असंच आता म्हणावं लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. या तुमच्या बेमुदत संपामध्ये जनतेची काय चूक आहे, तुमच्या आर्थिक हितासाठी त्यांना का नाहक भरडल जात आहे, त्यामुळे सध्या जनतेची सहानुभूती मिळण्याऐवजी त्यांच्या रोषालाच सामोरे जावे लागणार आहे.
आपली एसटी महामंडळ राज्यशासनात विलीन करण्याची ही जनतेच्या हिताची मागणी असतानाही संपकर्यांच्या बाजूने जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत नाही. याचाच अर्थ जनतेचं तुम्हाला सहकार्य नाही. एसटी कर्मचार्यांची राज्य शासनात विलिनीकरणाची भूमिका योग्य असून त्यामुळे कर्मचार्यांबरोबर प्रवाशांचेही खूप फायदे आहेत.
तीन महिने संप करून हे राज्यकर्ते आपल्या मागण्या मान्य करीत नाहीत. म्हणून संप करून आता प्रवासी जनतेला वेठीस धरण्यापेक्षा न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला हवेत. न्यायदेवता आपल्याला नक्कीच योग्य तो न्याय देईल, असे सुरेश भायजे यांनी सांगितले.