गरजेच्या वेळेला एखाद्या वेळी मदत करणे सुद्धा काही वेळा धोकादायक ठरू शकते. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्या कारणाने, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अनेक गावातून शहरी भागात येण्यासाठी अगदी ७-८ किमी सुद्धा चालत मुख्य रस्ता म्हणजे गावातील तिठ्यावर यावे लागते त्यानंतर मिळेल त्या वाहनाने शहरी भागात जाणे होते. त्यामुळे गावातील दुचाकी, चारचाकी वाहने एकमेकांना मदत म्हणून लिफ्ट देतात.
काल खेडशी तिठा गावामध्ये अशाच प्रकारची घटना घडून आली. पोलिसाकडून प्राप्त माहितीनुसार, स्वप्नतेज सुभाष कांबळे वय २६, रा. सोमेश्वर बौद्धवाडी, रत्नागिरी हा आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा घेऊन खेडशी लोहारवाडी ते खेडशीनाका असा प्रवास करत होता. त्याचवेळी ममता मधुकर सावंत वय ५०, रा. खेडशी बौद्धवाडी या शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर निघाल्या होत्या.
खेडशी तिठा येथे चालत जात असताना, रस्त्यात भेटलेल्या स्वप्नतेज कांबळे यांच्याकडे त्यांनी गाडीवरून तिठ्यावर सोडण्यासाठी आग्रह केला. त्यामुळे स्वप्नतेज कांबळे यांच्या दुचाकीवरून खेडशी तिठा येथे जात असताना गोपाळ जनरल स्टोअर येथे त्या दुचाकीवरून अचानक पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जास्त प्रमाणात रक्तस्राव देखील झाला.
त्या स्थितीत त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेची नोंद ग्रामीण ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार संतोष कांबळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्वप्नतेज याच्यावर भादवी कलम ३०४ (अ),२७९, ३३७, ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे करत आहेत.