मारुती मंदिर गोडबोले स्टॉप येथे नव्याने बांधण्यात आलेले आणि उघडे राहिलेल्या गटाराबाबत नगर परिषदेने वेळीच लक्ष घालून अनर्थ टाळावा अशी मागणी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आली होती. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर रत्नागिरी नगर परिषदेने त्या वृत्ताची तातडीने दखल घेत त्या ठिकाणी बांधकाम करून ते उघडे गटार बंदिस्त केले.
मारुती मंदिर गोडबोले स्टॉप येथे नव्याने बांधण्यात आलेले गटार वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी प्रचंड मनस्ताप ठरत आहे. नव्याने बांधण्यात आलेले हे गटार आहे की मृत्यूचा सापळा असा सवाल जनतेकडून केला जात आहे. मारुती मंदिर ते मजगाव रोड रस्त्यावर संध्याकाळी प्रचंड वर्दळ असते. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतुक आणि पादचारी यांची ये-जा सुरु असते. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या कडेने जाणारे पादचारी गटाराच्या बाजूने जातात, मात्र आयसीआय बँकेच्या विरुद्ध दिशेला असलेले गटार बंदिस्त न करता उघड्या स्थितीत ठेवले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी काळोखात या उघड्या गटाराचा भाग दिसून येत नाही.
येथे लहान मुलांचाही वावर अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे रात्रीच्या काळोखात एखादं मुलं या गटारात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. या ठिकाणी आठ दिवसापूर्वी या गटारामध्ये एक गाय पडलेली होती. तसेच एक व्यक्तीही पडून जखमी झाली होती. त्यांच्या हाताला, पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती.
प्रशासनाला खडखडून जागे करणाऱ्या वृत्तामुळे त्या गटारावर त्वरित बांधकाम करून ते बंदिस्त करण्यात आले. लोकांच्या जीवितास धोका ठरणारे हे गटार नगर परिषदेने त्वरित बुजवल्याने परिसरातील नागरिकांकडून याबाबत नगर परिषदेचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.