कोकणच्या सौंदर्यावर भाळून अनेक मराठी हिंदी चित्रपट सृष्टीचे चित्रीकरण विविध तालुक्यांमध्ये सुरु असते. मागील वर्षी कोरोना काळामुळे अनेक चित्रपटांची सुरु चित्रीकरण थांबवण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना सुद्धा विविध कलाकार पाहण्याची संधी मिळाली आणि त्याचप्रमाणे ग्रामीण स्तरावरचे उद्योग धंद्यांना सुद्धा गती मिळते आहे.
तालुक्यातील चार गावांमध्ये आपडी थापडी या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. यातील उलाढालीमुळे स्थानिक कलाकारांसह हॉटेल व्यवसायला बळ मिळाले आहे. इतकेच नाही तर गोपाळकृष्ण विद्यामंदिर येथे रेल्वे स्थानकाचा सेट उभारल्यावर या ठिकाणी जणू चित्रनगरी अवतरल्याचा भास होत होता. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे थांबलेले चित्रिकरण पुन्हा सुरू झाले आहे.
गेले १० दिवस आपडी थापडी या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण गुहागर तालुक्यात सुरू आहे. मुक्ता बर्वे, श्रेयस तळपदे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर हे चित्रपटामधील मुख्य कलाकार आहेत. गुहागरमधील चित्रिकरणासाठी राकेश साखरकर, आर्चिस तवसाळकर हे स्थानिक तरुण मदत करत आहेत.
अडूरमधील जुन्या घरांमध्ये, पालशेत बारभाई झोलाई मंदिर परिसरात, गुहागरमधील हायस्कूल व अंजनवेलमधील समुद्रकिनार्यावर चित्रिकरण करण्यात आले. आपडी थापडी या चित्रपटाची निर्मिती के. सी. पांडे यांच्या के. सायलेंट प्रॉडक्शनने केली आहे. कार्यकारी निर्माता विशाल शेट्टी, दिग्दर्शक आनंद करीर, निर्मिती व्यवस्थापक अंकित सातारकर आणि रवी हराले, निर्मिती सहाय्यक अजय जाधव लोकेशन मॅनेजर शरद तोंडवळकर यांच्या नेतृत्वात हे चित्रिकरण होत आहे. त्यामुळे चित्रीकरण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ गोळा होत आहेत.