शासकीय कार्यालयामध्ये कामाचा प्रचंड ताण निर्माण झाल्यामुळे डोके वर काढायला सुद्धा वेळ मिळत नाही. रत्नागिरीमधील जि.प. शिक्षण विभागातील अनेक पडे रिक्त असल्याचे वृत्त सोशल मीडियाद्वारे अनेक वेळा प्रसिद्ध झाले असेल परन्तु अजूनही या रिक्त जागा भरण्यात आल्या नाही आहेत.
रिक्त जागा वेळीच भरल्या गेल्या नसल्यामुळे त्या जागच्या कामाचा संपूर्ण ताण इतर उपस्थित कर्मचाऱ्यांवर लादला जातो. आधीच स्वत:चे काम पूर्ण करण्याकडे कल असताना पुन्हा दुसर्या पदाचा सुद्धा कार्यभार सोपवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची शारीरिक दुखाण्यानी मात्र डोकी वर काढली आहेत.
अतिरिक्त कामाचा भार आणि रिक्त पदे यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील साठ पैकी ४६ टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बहुसंख्य कर्मचारी मानदुखी, कंबरदुखी, डोळे आणि डोक्याच्या वरचेवर दुखण्याने त्रस्त दिसत आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. गजानन पाटील यांनी त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, त्यावर उपयुक्त असे मार्गदर्शन देखील करण्यास सुरूवात केली आहे.
प्रभारी शिक्षणाधिकारी पदावर नियुक्त झालेल्या डाएट प्राचार्य डॉ. पाटील यांनी जिल्हा परिषद सभागृहामध्ये कार्यालयीन कर्मचारी ताण, तणावमुक्त कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यामध्ये शिक्षण विभागातील साठ हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. तणावमुक्तीचा हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राज्यस्तरावर सादर केला जाणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. गजानन पाटील यांनी दिली आहे. जेणेकरून कर्मचार्यांना होणारा त्रास दूर होऊन ते उत्साहपूर्वक पुन्हा काम करण्यास तयार होतील.