रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे महिलेचे दुचाकीवरून अपहरण करण्याची घटना घडली. महिलेने केलेल्या प्रतिकारा दरम्यान झालेल्या झटापटीत महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर पळून गेलेल्या संशयित अपहरणकर्त्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घडलेली घटना अशाप्रकारे आहे कि, मनीषा मंगेश वारीसे वय ३५ असे मृत महिलेचे नाव असून दिगंबर शिंदे असे अटक केलेल्या संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे. मनीषा वारीसे या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. माघी गणेशोत्सवाच्या दिवशी आपले काम आटपून त्या गावातील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथे दर्शन करून त्या परतत असताना गावातील दिगंबर सुधाकर शिंदे पावसहून मावळंगे येथे जात होते.
मनीषा वाटेत भेटल्यानंतर तुझी आई आजारी आहे, तुला माहेरी सोडतो असे सांगून दिगंबरने तिला गाडीवर बसवले. पावस चावडीवाडी येथे तिचे माहेर आहे. पण तिथे आल्यावरही त्याने गाडी न थांबवता तशीच पुढे नेली, त्यामुळे महिलेला संशय बळावल्याने नाखरे साळवीवाडी इथे तिने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या दोघांमध्ये झटापट झाली आणि मनीषा वारीसे गाडीवरून रस्त्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यावेळी त्यांना मदत न करता आपला गुन्हा उघड होईल या भीतीने दिगंबर शिंदे याने तिला रुग्णालयात दाखल न करता, रस्त्याच्या बाजूला करून ठेवले आणि तेथून पोबारा केला.
परंतु, परिसरातील काही लोकांनी हि घटना पाहिली होती. या दरम्यान मावळंगे येथील प्रदीप थूळ आपल्या कामगारांना घेऊन त्या रस्त्याने जात असताना त्यांना महिला रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. त्यांनी याची माहिती पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात कळवली. या प्रकरणाची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घेतली. त्यांनी केलेल्या तपासात संशयिताची माहिती समजल्यानंतर त्याला दीड दिवसात अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्या दिगंबर सुधाकर शिंदे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. अखेर पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला पुढील तपासाकरिता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.