राजापूर मधील डोंगर विभागातील साखरकर कुटुंबीय १९९८-९९ सालापासून बेकरी व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. परंतु केवळ बेकरी व्यवसायावर न थांबता त्यांनी वेगळ काहीतरी निर्माण करण्याच्या उद्देशाने दहा वर्षापासून या शाही पराठा व्यवसायात पदार्पण केले आहे. कोणताही व्यवसाय म्हंटला कि, तो यशस्वी करण्यासाठी जिद्द, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सचोटीची जोड असेल तर तो संपूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बंधूंच्या बेकरी व्यवसाय ते शाही पराठा उद्योगाच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिल्यावर लक्षात येते.
शाही पराठयाच्या माध्यमातुन गहू, मैदा आणि मेथी असे तीन प्रकारचे पराठे तसेच पुरी आणि पुरणपोळीच्या उत्पादनातुन साखरकर बंधूंनी राजापूरचे आणि डोंगर गावचे नाव संपुर्ण महाराष्ट्राबरोबरच बाजूच्या अनेक राज्य जसे कि, गोवा, कर्नाटक, गुजरात पर्यंत पोहचविले आहे. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाचा डंका महाराष्ट्रा बाहेर देखील जोराने वाजत आहे.
आता लवकरच साखरकर बंधू या शाही पराठयाच्या माध्यमातुन मलबार लच्छा पराठयाचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे साखरकरांच्या शाही पराठयाची चव चाखणाऱ्यांना आता या नव्या मलबार लच्छा पराठयाची चव चाखता येणार आहे.
आता साखरकरांची तिसरी पीढीही या व्यवसाय काम करत असून साखरकर परिवाराचे सिराज साखरकर व शरफुद्दीन साखरकर या दोन बंधूंबरोबर सिराज साखरकर यांचे सुपुत्र नवीन साखरकर हे या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी राजापूर शहर आणि परिसरामध्ये हि बेकरी सुरु केल्याने, तेथील स्थानिक लोकांनाच त्यांनी रोजगार दिला असून, पूर्ण विश्वासाने येथी संपूर्ण स्टाफ काम करतो. स्थानिक ३० महिला आणि २ पुरुषांना त्यांनी रोजगार दिला आहे. यंत्रसामग्री सुद्धा अद्ययावत असल्याने अगदी यंत्राने पीठ मळण्यापासून ते ऑर्डर पाठविण्यापर्यंतची सर्व कामे स्टाफ मेम्बर्स करतात.