मागील तीन महिन्यांपासून सुरु असलेला एसटी मंडळाचा संपामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामध्येच आता कोरोना प्रभाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु झाल्याने देवरुख डेपोमधून पांगरी पोस्ट ऑफिस स्टॉपपर्यंत खास विद्यार्थ्यांसाठी एसटी सुरु करण्यात आली आहे. पण आज अचानक एसटी बस न आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी देवरुख एसटी. आगाराच्या नावाने शंख केला आहे.
कोरोनाच्या कालावधीत दोन वर्षांत ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या गोंधळात मुलांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्यावर वेळेत पोहोचता यावे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी येथील ग्रामस्थांनी देवरुख ते पांगरी स्टॉप पर्यंत एसटी सुरु करण्याची लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती.
त्यानुसार मागील तीन दिवसापासून देवरुख ते पांगरी पोस्ट ऑफिस स्टॉप पर्यंत बस सुरु करण्यात आली. पांगरी तसेच चांदीवणे गावातून पांगरी हनुमान स्टॉप या ठिकाणची विद्यार्थी येथे बससाठी थांबतात. मात्र आज अचानक सकाळी ९ वा. येणारी ही बस न आल्याने ३०-३५ विद्यार्थ्यांना ९ वाजल्यापासून पुढील बसची वाट बघेपर्यंत ११ वाजेपर्यंत ताटकळत रहावे लागले आहे.
त्याच दरम्यान सकाळी ९.१० च्या दरम्याने रत्नागिरीहून देवरुखला जाणारी एक बस आली मात्र ती खचाखच भरलेली असल्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांना घेण्यात आले नाही. एवढया उशिरापर्यंत बस न आल्याने मुले शाळेत केव्हा पोहोचणार? असा प्रश्न पालकांना पडला आहे. सध्या मुलांच्या परीक्षा देखील सुरू आहेत. तुळसणी हायस्कुल, निवे हायस्कुलमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी या एसटीने प्रवास करतात.
याबाबत येथील ग्रामस्थांनी देवरुख एसटी डेपोशी संपर्क साधला असता, तिथून मिळालेले उत्तर असे कि, आज आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, चालक वाहक आजारी आहेत त्यामध्ये एसटीचा संप सुध्दा आहे यामुळे बस सोडणे कठीण आहे. यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सततच्या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? जर देवरुख ते पांगरी पोस्ट ऑफिस स्टॉपपर्यंत पुन्हा एसटी सुरु झाली नाही तर, आम्ही ग्रामस्थ रास्ता रोको करु असा इशारा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे एसटीच्या आडमुठेपणाचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या घटनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.