रत्नागिरीमध्ये अद्यापही अनेक लोककलावंतानी अनेक प्राचीन कला परंपरा जपून ठेवल्या आहेत. सध्या कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून सर्वच धार्मिक, शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे केवळ त्यावरच उदरनिर्वाह सुरु असलेल्या लोककलावंतांचे जीवनमान खूपच खालावले आहे. अनेक कलाकारांची उपासमार होऊ लागली आहे त्यामुळे शासनाने त्यांच्यासाठी मानधन स्वरुपात काही रक्कम मिळण्याची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यातील देवरूख नजीकच्या पाटगाव लिंगायतवाडीतील सचिन वसंत लिंगायत वय ३९ या तरूणाने दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सचिन हा तालुक्यातील नामांकित लोककलावंत होता. अचानक सचिनने उचललेल्या या आत्महत्येच्या पाउलाने तालुक्यात एकच खळबळ मजली आहे. अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. परंतु, नक्की काय घडले आहे आणि सचिनने त्यातून जीवन संपवण्याचे पाउल उचलले अद्याप याचे गूढ उकललेले नाही.
याबाबत देवरूख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचा ८ वर्षांपुर्वी घटस्फोट झाला होता. तेव्हापासून तो सतत टेन्शनमध्ये असायचा. तो त्याचा भाऊ महेश याच्यासोबत घरी राहत होता. मात्र दुपारी घरात कोणीही नसल्याचे पाहून, सचिनने घराच्या खोलीतील लाकडी खांबाला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची माहिती सचिनचा चुलत भाऊ प्रदिपने देवरूख पोलीस स्थानकात दिली.
यानंतर देवरूख पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची देवरूख पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास हे. काँ. संतोष सडकर करीत आहेत. दरम्यान, सचिनने गळफास घेवून अशाप्रकारे आपली जीवनयात्रा संपवल्याने त्याच्या मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.