मागील दोन वर्षे कोरोनामुळे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन भाविकांना घेता आले नव्हते. मात्र उद्या २४ फेब्रुवारीला होणाऱ्या उत्सवात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन तिच्या सर्व भक्तांना घेता येणार आहे. देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंडळाने पूर्ण व्यवस्था केली आहे. त्यामध्ये दर्शनासाठी ९ प्रमुख रांगा आणि २ विशेष रांगा अशी एकूण अकरा रांगांची व्यवस्था केली असल्याची माहिती आंगणेवाडी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
वार्षिकोत्सकाची तयारीची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, मधुकर आंगणे, रामदास आंगणे यांनी आंगणेवाडी येथे दिली. यंदा कोरोनाचे नियम पाळून हा वार्षिकोत्सक भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे. दररोजचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर, गुरुवारी पहाटे ३ वाजल्यापासून दर्शनासाठी देवीचे मंदिर खुले होणार आहे.
या यात्रेच्या नियोजनासंदर्भात काल, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंगणे कुटुंबीयांसोबत कुडाळ येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जनतेच्या हिताचे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मागील वर्षांपेक्षा यंदा हा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा केला जाणार असून, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही पूर्ण लसीकरण बंधनकारक असणार आहे. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करूनच ही यात्रा संपन्न होणार आहे.
व्यापाऱ्यांसाठी जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यांचे १०० टक्के पालन करणे बंधनकारक असणार आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील स्टॉलच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. स्टॉल्स, दुकानांची संख्या जेवढी कमी करता येईल, तितकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठीच्या राहण्याच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी प्रत्येकाने काटेकोरपणे घेतलीच पाहिजे. त्याबाबत व्यवस्थित नियोजन प्रशासनाकडून करण्यात येईल, असेही नाम. सामंत यांनी सांगितले.
आपल्या सर्वोत्तम नियोजनासाठी व भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी नेहमीच आदर्शवत कामगिरी बजावणाऱ्या आंगणे मंडळाकडून यावर्षीही देवीच्या सुलभ दर्शनासाठी सुविधा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.