राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामध्ये सर्व परीक्षा या ऑफलाईन होणार असून बैठक व्यवस्था, वेळापत्रक सर्व विद्यार्थ्याना १८ फेब्रुवारीपासून देण्यात आले आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल झाला आहे.
संगमनेर जवळ चंदनपुरी घाटातील अपघातात प्रश्नपत्रिका नेणारा टेम्पो आगीत जळुन भस्मसात झाल्याने त्यामध्ये असणाऱ्या हिंदी आणि मराठीच्या प्रश्नपत्रिका पूर्णपणे जळून खाक झाल्यात. त्यामुळे ऐन परीक्षा तोंडावर असताना ही घटना घडल्याने बोर्डाने हा अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्चपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची मध्य प्रदेशातील भोपाळ येथे छपाई करून, त्या पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पोच करण्यासाठी टेम्पोमधून नेल्या जात होत्या. पहाटे नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी घाटातील हॉटेल साईप्रसादसमोर पाठीमागील बाजूने आग लागल्याचे लक्षात आले. चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून आग विझविण्या साठी प्रयत्न केले. परंतु, तो पर्यंत आगीने संपूर्ण टेम्पोचा ताबा घेतला होता आणि त्यामध्ये टेम्पोसह आतील दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ५ आणि ७ मार्चला होणाऱ्या विषयाची परीक्षा आता ५ आणि ७ एप्रिलला होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यामध्ये बाकीच्या पेपर नियोजनात कोणताही बदल झालेला नाही. तसेच दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.