जिल्ह्यासह राज्यात सीएनजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. चीन आणि युरोपमधून गॅसचा कमी पुरवठा होत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यात पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने अनेक वाहनधारकांनी गॅसकीट बसवून घेतल्याने, गॅसची मागणी जास्तच वाढली आहे. तुटवड्यामुळे मागणी तेवढा पुरवठा करणे शक्य होत नसल्याने आणखी काही महिने राज्यामध्ये सीएनजी गॅसची हीच परिस्थिती राहणार असल्याची माहिती अशोका सीएनजी गॅसचे प्रमुख भारद्वाज यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. सीएनजी वाहने खरेदी करण्यासाठी यापूर्वी कंपनीकडुन अनेक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. तसेच त्याची मागणी वाढू लागल्याने अनेक ठिकाणी सीएनजी पंप देखील उभारण्यात आले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून आता दर ११२ रुपये लिटर एवढा झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता पेट्रोलची वाहने चालवणे परवडणे कठीण बनले आहे.
सीएनजी गॅसचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे राज्यात सीएनजीच्या वाहनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताला चीन आणि युरोपमधून सीएनजी गॅसचा पुरवठ्यामध्ये २५ ते ३० टक्के कपात झाली आहे. त्यामुळे जो गॅस उपलब्ध असतो, त्याचेच सर्वत्र वितरण केले जाते.
जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये सुद्धा सीएनजी गॅसच्या तुटवड्यामुळे तालुक्यातील सीएनजी गॅसवर चालणार्या रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. येथील वालोपे व रावतळे येथील पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांसह सीएनजी वाहकांची सुद्धा प्रचंड गर्दी होत असून दूरपर्यंत रांगा दिसतात. त्यामध्ये गॅसला अपेक्षित प्रेशर मिळत नसल्याची वाहन धारकांची तक्रार आहे. याबाबत गेली आठ दिवस रिक्षा व्यावसायिकांना गॅस भरण्यासाठी रांगेमध्ये अडीच ते तीन तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. गॅस कंपनीने तात्काळ त्यावर उपाययोजना करावी अशी रिक्षा संघटनेचे दिलीप खेतले, राजू महाडीक, अविनाश कदम या चालकांनी केली आहे.