देवगड येथे अनधिकृत मच्छिमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाने पकडलेल्या रत्नागिरी येथील मुसा अब्दुला या नौकेला १ लाख रूपये दंड व नौकेचा परवाना तीन महिन्याकरीता निलंबित करण्याची कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाने केली आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्ती नौकेद्वारे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर आणि सागरसुरक्षा रक्षक समुद्रात गस्त घालत असताना सकाळी ७ वा.सुमारास विजयदूर्ग बंदरासमोरील आठ वावांमध्ये रत्नागिरी येथील मुजाहीर अब्दूल रेहमान होडेकर यांच्या मालकीची मुसा अब्दुल्ला ही अनधिकृतपणे मच्छिमारी करताना पकडली होती. या नौकेचा ट्रॉलींग मासेमारीचा परवाना असताना नौकेवर पर्ससीन जाळी आढळून आली. नौकेवरील २० खलाशांपैकी फक्त ६ खलाशांचा विमा उतरविलेला आढळून आला होता. त्यामुळे मासेमारीच्या नवीन कायद्यांमुळे अनेकांना शिक्षा आणि भुर्दंड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या नौकेचा ट्रॉलींग मासेमारीचा परवाना असताना नौकेवर पर्ससीन जाळी आढळून आली. लायसन्स अटी व शर्तींचा भंग, जाळ्यांची साईज, पर्ससीन मासेमारीस बंदी असताना या नौकेवर पर्ससीन जाळे, नौकांवर मासळी आढळली नाही. यामुळे महाराष्ट सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कलम १५ नुसार कारवाई केली होती व प्रतिवेदन सादर करण्यात आले होते. यावर सुनावणी होवून महाराष्ट सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारीत अध्यादेश कलम १७ चे ५(१) अन्वये नियमाचा भंग केल्यामुळे नौका मालक मुजाहीर अब्दूल रेहमान होडेकर, रत्नागिरी यांना १ लाख रूपये दंड व नौकेचा परवाना ३ महिन्याकरीता निलंबित करण्याचा कारवाईचे आदेश सहाय्यक मत्स्यव्यवसाय रवींद्र मालवणकर यांनी दिले आहेत.