सोशल मिडीयाचा वापर सध्याच्या तरुणाई मध्ये एवढा वाढला आहे कि, आपली, भांडण, फिलिंग्स, प्रेम, राग व्यक्त करण्यासाठी सुद्धा प्रत्यक्ष समोर न बोलता मेसेज अथवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि मग त्याचे काही ना काही तरी प्रतिसाद उमटतात. अशीच एक घटना रत्नागिरी मध्ये घडली आहे. दीड महिन्यापूर्वी घडलेली घटना परंतु, शुल्लक कारणावरून त्याचे रुपांतर मारामारीत झाले आहे.
किरकोळ कारणावरून आई आणि मुलीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना रात्री १० वाजण्याच्या दरम्यान रेल्वे कॉलनीतील रस्त्यावर घडली.
घडले असे कि, ज्योती गांगरकर यांची मुलगी अस्मिता हिने रेश्मा तांदळे इन्स्टाग्रामवर आपली बदनामी करत असल्याचे आपल्या आईला सांगितले होते. तेव्हा ज्योती गांगरकर यांनी आपल्याला कोणासोबत वाद घालायचे नाहीत, तू तिच्या आईला जाऊन सांग असे सांगितले. त्याप्रमाणे अस्मिता ही अनुराधा तांदळेना सांगण्यास गेली असता तिने अस्मिताला मारायला सुरुवात केली. तेव्हा अस्मिताला सोडवण्यासाठी तिची आई ज्योती मध्ये पडली असता अश्रुबा तांदळे, अनुराधा तांदळे आणि रेश्मा तांदळे या तिघांनीही ज्योती आणि अस्मिताला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली.
अश्रुबा तांदळे, अनुराधा तांदळे आणि रेश्मा तांदळे सर्व रा.रेल्वे कॉलनी नर्मदा बिल्डिंग, रत्नागिरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात ज्योती दीपक गांगरकर वय ३९, रा.रेल्वे कॉलनी शरावती बिल्डिंग, रत्नागिरी यांनी गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी अधिक तपास महिला पोलिस हवालदार नाचणकर करत आहेत.