कोरोना काळामध्ये स्वतच्या जीवाची पर्वा न करता, दिवसरात्र रुग्णसेवेसाठी काम करीत असलेल्या नर्स, कक्षसेवक, दाई आणि विविध तंत्रज्ञ यांना मागील पाच महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. सदर थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात यावे अन्यथा कार्यालयातच ठिय्या आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. समविचारीच्या या इशा-यावर जिल्हा रुग्णालयात पोलिसांना आधीच पाचारण करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक जाणूनबुजून याकामी दुर्लक्ष करुन पगार देण्यास दिरंगाई करत असल्याचे समविचारींनी सांगितले. कुणी कितीही खबरदारी घेतली तरी समविचारीची ठरलेली आंदोलने त्या वेळेतच होतात. त्यामुळे या कर्मचार्यांना जो पर्यंत न्याय आणि त्यांचा थकीत पगार मिळत नाही तो पर्यंत आम्ही शल्य चिकित्सकांच्या कार्यालयामध्ये ठांड मधून बसणार, असे समविचारी संघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयातून रुग्णाला सोडताना विविध प्रकारचे दाखले किंवा वैद्यकीय सर्टिफिकेट दिले जाते. परंतू, या दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांचे दर हे शासकीय रुग्णालयाच्या दरपत्रकाप्रमाणे न आकारता, चढ्या दरात वितरीत केले जात असून, यामध्ये सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम जोमात सुरु आहे. याबाबतही त्रस्त नागरिकांनी समविचारीच्या पदाधिकार्यांना लक्ष घालण्यास विनंती केली आहे. जेणेकरून सामान्य जनतेची आर्थिक लुट बंद होईल.
याबाबतीत समविचारी मंच लक्ष ठेवून असून जिल्हा रुग्णालय अंतर्गत चाललेल्या गैर कारभाराविरोधात दणदणीत आंदोलन पुकारेल असा इशारा सर्वश्री बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, मनोहर गुरव, निलेश आखाडे, रघुनंदन भडेकर, सौ.गंधाली सुर्वे आदींनी दिला आहे. त्यामुळे लवकरच या शासकीय रुग्णालयाच्या मनमानी कारभाराला आळा बसेल आणि सामान्य नागरिकांची त्यातून होणारी पिळवणूक थांबेल.