सोमवारी रात्रीपासून राजापूर शहरातील चव्हाणवाडी येथून बेपत्ता असलेला एक ४० वर्षीय इसम रानतळे येथील सड्यावर मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान या मृत इसमाच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यावर मारहाणीच्या खूणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
व्यवसायाने सलून व्यवसायिक असलेले राजेश वसंत चव्हाण वय ४०, रा. चव्हाणवाडी राजापूर असे मयत इसमाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, चव्हाणवाडी येथील सलून व्यवसायिक राजेश चव्हाण हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत.
अखेर मंगळवारी त्यांच्या पत्नीने सकाळी राजापूर पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता राजेश याचे शेवटचे मोबाईल लोकेशन रानतळे येथे मिळाले. पोलिसानी या परिसरात शोध घेतला असता मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉट पासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर सड्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची खबर मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे व त्यांचे सहकारी घटनास्थळीदाखल झाले. दरम्यान राजेश याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तसेच चेहऱ्यावर जोरदार मार लागला होता. चेहरा रक्ताने माखलेल्या स्थितीत होता. तसेच राजेशच्या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचा मोबाईल फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मृतदेहाजवळ ग्लास व खाद्य पदार्थही आढळून आले. त्यामुळे राजेश याचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अखेर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर रुकसार उर्फ सलमान मोहमंद सलमानी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. राजेश याने रुकसार याला “माझ्या मोबाईलला अश्लील व्हिडियो आहे, ३० हजार रुपये दे अन्यथा ते व्हिडियो व्हायरल करेन” अशी धमकी दिली. याचा राग मनात धरून रुक्सार याने राजेश याला रानतळे येथे नेऊन दारू पाजून, त्याच्या डोक्यावर दगड घालून त्याची हत्या केली. राजापूर पोलिसांची काही तासामध्येच खुन्याचा शोध लावल्याने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे.