रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात काल दुपारी २.३० वा.च्या दरम्यान अपघात झाला होता. कार ४०० फूट खोल दरीत कोसळली. या कारमधून ८ जण सांगली वरून गणपतीपुळे येथे जात होते. मात्र आंबा घाटात गाय मुखाजवळ आल्यावर, चालकाचा रस्त्याचा अंदाज चूकल्यामुळे गाडी थेट ४०० फुट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात २ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे त्या बाळाच्या आईचाही मृत्यू ओढवल्याचे पोलिसानी सांगितले. त्याशिवाय अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या आणि अपघात क्षेत्र असलेल्या आंबा घाटात कार कोसळल्याची माहिती प्राप्त झाल्यावर साखरप्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची आणखी कुमक याठिकाणी मागविण्यात आल्याचे समजते. सदरची अपघातग्रस्त कार ४०० फूट खोल दरीत कोसळली असून या गाडीत एकूण ८ जण प्रवास करत होते. त्यांच्या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश हरकुडे (२ महिने), सृष्टी संतोष हरकुडे (३२) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर संतोष हरकुडे, दीप्ती फुलारे, प्रताप तपस्ते, रेयान सुभेदार, आद्या फुलारे, तन्मिना हरकुडे सर्व रा. सांगली हे सहाजण गंभीर जखमी आहेत. त्यांना १०८ रुग्णवाहिका आणि नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
साखरपा पोलीस, आंबा येथील स्थानिक तरुण, राजू काकडे हेल्प अकादमी आणि जय शिवराय मित्रमंडळ कार्यकर्ते एवढ्या खोल दरीत उतरून अपघातग्रस्तांपर्यंत पोहचून त्यांना तत्काळ मदत केली. त्यामुळे त्या सर्व गंभीर जखमी झालेल्याना त्वरित उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले.