मुंबई- गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज देखील हातखंबा येथील दर्ग्यानजीकच्या उतारात ट्रक, एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ट्रकचालकांच्या बेदरकारपणे वाहन चालवण्यामुळे आज एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथे नुकत्याच झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली आहे. तर दुचाकीवरील मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून एक दुचाकीस्वार व महिला प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान हातखंबा येथे ऍक्टिवाला ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे समजते. यात कापडगाव येथील महिला सुमित्रा कोत्रे ही जागीच ठार झाली.
दर्ग्या नजीकच्या उतारात दुचाकीच्या पुढे एसटी बस असल्याने दुचाकीस्वार दुचाकी क्रमांक एम. एच.०८, ए. एल १२९९ दीपक कोत्रे याने दुचाकीचा वेग कमी केला. याचवेळी मागून येणाऱ्या कर्नाटक येथील ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने समोर असलेल्या एसटी बसवर कोत्रे याची दुचाकी आदळली.
या विचित्र अपघातात दुचाकीवर मागे बसलेली दीपकची आई सुमित्रा कोत्रे ही जागीच ठार झाली. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. अपघातग्रस्त ट्रक हा कर्नाटकचा असून पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती कळताच अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.