28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriआजपासून थिबा राजवाडा परिसरामध्ये कातळशिल्प पर्यटन महोत्सव सुरू

आजपासून थिबा राजवाडा परिसरामध्ये कातळशिल्प पर्यटन महोत्सव सुरू

शनिवारी संध्याकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सापडलेली कातळशिल्पे जतन करून ठेवण्याचे शासनाकडून ठरविण्यात आले आहे. अनेक संशोधक यावर काम करत असून, अजून इतिहासकालीन काही माहिती मिळते का याबाबत संशोधन सुरु आहे.

आजपासून थिबा राजवाडा परिसरामध्ये पर्यटन संचालनालय, निसर्गयात्री संस्था आयोजित पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या वृध्दीसाठी या महोत्सवाचा चांगला उपयोग होणार आहे.

कला प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होत आहे. या प्रदर्शनात रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यातील पर्यटनस्थळांचे सादरीकरण करणारे ४ स्टॉल,  अवेकनिंग ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांच्या वस्तूंचे स्टॉल्स आहेत. तसेच कथित संस्थेने साकारलेल्या वारसा जपणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन, देवरुखच्या डी कॅड कॉलेजचे कला प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. दगडांमधील प्रकार, दगडांपासून आदिमानव हत्यारे कशी तयार करत होता याचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक प्रा. डॉ. तोसोपंत दाखवणार आहेत. कातळ खोद चित्रांच्या भेटवस्तूंचे प्रदर्शन, वाळू व अन्य माध्यमातून खोद चित्रांच्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत.

पुरातत्त्वशास्त्राचे विद्यार्थी प्राचीन काळातील खेळांचे सादरीकरण करणारे स्टॉल्स मांडणार आहेत. तसेच कोकणी खाद्य जत्राही भरवण्यात येणार आहे. यामध्ये आरती डायनिंग, सिद्धाई फूड प्रॉडक्टस, पानगी, खादाडी कट्टा, आदींचा समावेश आहे. शनिवारी संध्याकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत बाबर,  रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकुर,  प्रा.डॉ. तोसोपंत पधान,  पुरातत्व विभाग सहायक संचालक विलास वहाणे, माजी माहिती व जनसंपर्क अधिकारी सतीश ललित उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी महोत्सवाकरीता सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवर मार्गदर्शन करतील. नंतर संगमेश्वरी बोली कार्यक्रम, नमन, गाऱ्हाणे, शॉर्ट फिल्मचे सादरीकरण, जाखडी, कोकणातील कातळशिल्पांची माहिती देणारे सादरीकरण असे कार्यक्रम होतील.

RELATED ARTICLES

Most Popular