भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आज दापोलीत अनिल परब यांचा अनधिकृत बंगला पाडण्यासाठी येत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबत त्यांनी प्रतिकात्मक हातोडाही सोबत घेतला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज दापोली दौऱ्यावर असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री अनिल परब यांचा बेकायदेशीर पणे बांधण्यात आलेला रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झालेत.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी किरीट सोमय्यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही असे आव्हान दिले होते. मात्र कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे म्हणाले, सोमय्यांसोबत मी सुद्धा दापोलीला जात आहे, कोणाच्यात हिंमत असेल तर अडवून दाखवावे. आम्हीसुद्धा दोन हात करायला तयार आहोत. संजय कदम सोमय्यांना अडवणार की, राणे दोन हात करणार हे लवकरच कळेल. मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीने दापोलीत वातावरण तंग झाले आहे. पोलिसानी जास्तीचा फौजफाटा मागवून बंदोबस्त वाढवला आहे.
आज सकाळीच किरीट सोमय्या यांच्या घराखाली ४०-५० समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या गाड्यांची रांग पाहायला मिळाली आहे. शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. परिवहन मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत साई रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असा नारा लगावला. सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये त्यावेळी प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.