संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ३१ मे पर्यंत अत्यावश्यक सुविधा वगळून संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. ते संपत असताना ३१ मे नंतर काय ! लॉकडाऊन वाढणार कि संपणार या बद्दल सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते वादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असताना सुद्धा अनेकांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन बद्दल विचारणा केली आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची त्यावेळची परिस्थिती बघून, योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसर्या लाटेमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्याच प्रमाणात झाल्याने रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ठ झाला आहे. जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत, त्याचं लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याचे, फक्त घातलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत नाम.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये लॉकडाऊन वाढणार का ! असा प्रश्न विचारला गेला असता, त्यांनी सांगितले कि, रत्नागिरी जिल्हयाचा कोविड परिस्थितीमुळे रेड झोन मध्ये समावेश करण्यात आल्याने अजून तरी पुढे ८ दिवस अधिक लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याची शक्यतेबद्दल सांगितले आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी मिश्रा,आरोग्य अधिकारी, संदर्भित अधिकारी यांच्याशी एकूण परिस्थितीबद्दल चर्चा, सल्ला-मसलत केली असता, जरी कोरोना संक्रमणाचे प्रमाण आणि मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येमध्ये घट झालेली दिसून येत असली तरी अजून काही दिवस तरी लॉकडाऊन असणे गरजेचे असल्याचे सर्व अधिकाऱ्यांचेही मत असल्याचे समोर आले आहे. परंतु, अखेरचा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात येईल असे नाम. सामंत यांनी सांगितले.