वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज ३० एप्रिल २०२२ रोजी आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी, ३० एप्रिलच्या रात्री सूर्यग्रहण होणार आहे. परंतु हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे. यामुळे भारतात या ग्रहणाचे वेध पाळण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु, शनिश्चरी अमावस्येशी संबंधित शुभ कार्य दिवसभर करता येणार आहेत.
चैत्र महिन्यातील अमावस्या येत आहे. हि अमावस्या शनिवारी असल्याने तिला शनिश्चरी अमावस्या म्हणतात. या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करण्याची पुरातन परंपरा आहे. जर तुम्हाला नदीत स्नान करणे शक्य नसेल, तर तुम्ही तीर्थक्षेत्रे आणि नद्यांचे ध्यान करताना घरीच स्नान करू शकता. पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळा आणि त्या पाण्याने स्नान केल्याने देखील तीर्थयात्रे एवढेच पुण्य मिळू शकते.
हे ग्रहण दक्षिण पॅसिफिक महासागर दक्षिण अमेरिका इत्यादी ठिकाणी दिसणार आहे. या देशांमध्ये ग्रहणाच्या वेळी दिवस असेल त्यामुळे त्यांना सूर्यग्रहण सहज पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी दुपारी १२.१५ वाजता सुरू होईल आणि १ मे रोजी पहाटे ४.०८ वाजता समाप्त होणार आहे.
तर जाणून घेऊया, शनिश्चरी अमावस्येला कोण-कोणते शुभ कार्य केली जाऊ शकतात.
शनिश्चरी अमावस्येला पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान आणि दर्शन घेण्यास विशेष महत्त्व आहे. शनिवारी अमावस्या आल्याने या तिथीचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी शनिदेवाला काळे तीळ दान करण्याची प्रथा आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे अनेक जीव पाण्यासाठी वणवण भटकताना दिसतात. अशांसाठी, सार्वजनिक ठिकाणी पाणपोई लावावीत किंवा नैसर्गिकरित्या थंड पाण्यासाठी माठाचे दान करावे. पितृ हा या तिथीचा स्वामी आहे. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण इत्यादी शुभ कार्य करावे. पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करावी. गाय, कुत्र्यासाठी भाकरी टाकावी. पिठाचे गोळे बनवून तलावातील माशांना खाऊ घाला. मुंग्यांना पीठ टाकावे. हे छोटे छोटे शुभ कार्य अक्षय पुण्य देणारे आहे.