राज्यात अनेक राजकीय वादळे घोंघावत आहेत. गेला महिनाभर कोणत्या ना कोणत्या कारणावरून अनेक राजकीय घडामोडी घडून येत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आहे. मग ते राज ठाकरेंच मशिदीवरील भोंगा प्रकरण असो कि राणा दाम्पत्याचं मातोश्री समोर बसून हनुमान चालीसा पठण असो. या दोन्ही प्रकरणांनी मुंबई अक्षरशः हलवून सोडली. पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला. विरोधकांनी मुख्यमंत्री महोद्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले.
राज्यात सध्या विचारांचं प्रदूषण होत आहे. विकृत विचार मांडले जात आहेत. बर्याच दिवसांनी मास्क काढून भाषण करतोय, मात्र १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला, वेगळे काही राजकीय बोलून पाणी गढूळ करणार नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे टोमणे मारण्याची संधी साधलीच.
मुख्यमंत्री म्हणाले, एक तर काम करू द्यायचे नाही आणि केले तर भ्रष्टाचार झाला असे म्हणत ओरडत सुटायचे. राजकारण जरुर करावे, पण राजकारणातही एक लेवल असली पाहिजे. विरोधी पक्ष म्हणजे काय? नुसता विरोध करत सुटणार का? सरकार चुकत असेल तर जरूर कान उपटा, पण सरकार चांगलं काम करत असेल, तर कौतुक करण्याची देखील एक दर्यादिली पाहिजे, जी आजच्या विरोधी पक्षात अजिबात दिसून येत नाही.
आता सार्वजनिक ठिकाणी सभांना तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये आलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मांडायच्या आहेत, असे संकेतही यावेळी दिले.