हवामान विभागाने यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार, असा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार पूरक असे बदल निसर्गामध्येही घडू लागले आहेत. समुद्राच्या लांटामधून किनारपट्टीवर तांबूस रंगाची फेणी म्हणजे फेस येण्यास सुरवात झाला आहे. हा फेस गडद होत गेला की मान्सून कालावधी जवळ येतो, असे निरीक्षण किनारी भागात राहणारे जाणकार नागरिकांसह मच्छीमारांनी वर्तवला आहे.
मोसमी पाऊस यावर्षी काही दिवस आधीच कोकणात पोचेल, अशी शक्यता आहे. त्यानुसार शेतकरी, मच्छीमार यांना नियोजन करावे लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर मान्सुनची चाहूल दर्शवणारे बदल दिसू लागले आहेत. दरवर्षी सर्वसाधारणपणे २० मे नंतर समुद्रकिनारी दिसणारे बदल आतापासूनच जाणवू लागले आहेत. त्यामुळे पावसाळा लवकर सुरू होणार, असा ठोकताळा मच्छीमार बांधत आहेत.
सध्या समुद्र खवळलेला असून वारेही वाहायला सुरवात झाली आहेत. किनाऱ्यावर जाणवणारा या पद्धतीचा वारा २० मेनंतर वाहत असतो. परंतु, यावर्षी त्याची सुरुवात लवकरच झाली आहे. पक्षांना देखील पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्याने, त्यांनी देखील पावसातील संरक्षणासाठी घरटी बांधण्यासाठी काड्या जमा करायला लागल्या आहेत.
पावसापूर्वी अनेक लक्षणे नैसर्गिक रित्या दिसू लागतात. पावसाळयाआधी दिसणाऱ्या धनेश पक्षाचेही दर्शन काहींना होऊ लागले आहे. मुंग्यांची दाट आणि गडद वारुळे तयार होऊ लागली आहे. त्यावर पाणी पडले तरीही त्याचा चिखल होत नाही. किनारी भागासह आजूबाजूच्या परिसरातील दिसणारे बदलानुसार ४ ते ५ जून या कालावधीत पाऊस सुरू होईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान, मान्सून अंदमानात दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
पावसाळा जवळ आला की समुद्र किनारी भागात लाटांबरोबर तांबूस फेस जमा होऊ लागल्यावर, किनाऱ्यावर खाद्यान्नासाठी स्थलांतरित झालेले अनेक पक्षी परतू लागले आहेत. भाट्ये खाडी किनारी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. त्या पक्ष्यांची संख्या पावसाआधी कमी झाली आहे. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात अनेक छोटे-मोठे मासे प्रजननासाठी खाडी किनाऱ्याकडे येऊ लागतात, तर कोळंबीही सापडू लागली आहे. हि सगळी लक्षे म्हणजेच पावसाचे लवकर आगमन होण्याची वर्दी असल्याचे अनेक मच्छीमारांचे मत आहे.