चिपळूण तालुक्याला मागील वर्षी बसलेल्या महापुराच्या फटक्यामुळे, नदीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गेल्या चार महिन्यांपासून वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असला तरी हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी अद्याप किनाऱ्यावरच आहे. हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चिपळूण बचाव समितीने बेमुदत साखळी उपोषण करून पूर प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष वेधले होते. या आंदोलनाचा केंद्र स्तरापर्यंत पाठपुरावा करण्यात आला. शासनाने गाळ काढण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. मात्र काढलेला गाळ वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पात्रालगत अनेक ठिकाणी किनाऱ्यावरच ठेवलेला दिसत आहे. कोकणातील पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पहिल्या दोन चार पावसातच हा गाळ पुन्हा नदीत जाईल आणि तसे झाल्यास शहरावर पुराची टांगती तलवार कायम राहील.
गतवर्षी आलेल्या महापुरामुळे या गाळ प्रकरणी नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने गाळ काढण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले. जानेवारी महिन्यापासून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्याप ते पुर्ण झाले नसून जेमतेम पन्नास टक्केच गाळ काढण्यात आला आहे. काढलेला गाळ अनेक ठिकाण वाशिष्ठी नदीच्या काठावरच रचून ठेवलेला आहे. यामुळे जर अचानक अतिवृष्टी झाली तर हा उपसलेला गाळ पुन्हा नदीत पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा मग काय उपयोग? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वाशिष्ठी व शिवनदीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम झाले असले, तरी प्रत्यक्षात काढलेला गाळ पुन्हा नदीपात्रात जाणार असल्याने चिपळूणचा पुराचा धोका टळेल की नाही याबाबत आता तरी कोणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही.