कोरोनाची महाभयंकर २ ते अडीच वर्ष पार पडल्यानंतर, पुन्हा हे संकट उद्भवू नये यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. दिल्ली मध्ये कोरोन प्रकरणाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर शेजारील सर्व राज्यांना अलर्ट करण्यात आले आहे. तीन महिन्यानंतर मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याची आकडेवारी समोर येत आहे. या वाढीबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा झाली. मुंबईकरांना आता पुन्हा एकदा सावध होण्याची व निर्बंध टाळण्यासाठी कटकोर नियम पाळण्याची गरज आहे.
मुंबईत कोरोना संसर्ग पुन्हा पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यानंतर मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत काल एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार गुरुवारी शहरात ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी ११ फेब्रुवारीला ३५० पेक्षा अधिक म्हणजे ३६७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एकाच दिवसात काल सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मुंबईत पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या लोकांनी सावधानता बाळगली पाहिजे, अशी माहिती मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कोरोनाचा सुरु झालेला प्रसार लक्षात घेता, कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत संक्रमित रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली, असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात १८.५२ टक्के ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे.