संपूर्ण राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेट्रोलची झालेली दरवाढ कमी करण्यात आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पंप धारकांना हातचे पैसे भरावे लागून भुर्दंड बसत आहे. इंधनवरील कर कमी करून केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला ही गोष्ट जरी चांगली असली तरी त्याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसत आहे.
एका बाजूला शासनाने सन २०१९ पासून पेट्रोल पंप चालकांच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. तर आता जनतेला सूट देताना शासन आमच्या खिशातून पैसे काढत आहे. याच्या विरोधात दि. ३१ मेला पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिवशी पेट्रोल विक्री मात्र सुरू राहणार असल्याचे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. मात्र यामुळे जूनच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीतच नव्हे तर संपूर्ण राज्यातच पेट्रोलचा तुटवडा आहे. रत्नागिरीतील पेट्रोल पंपांमध्ये 2 दिवस पेट्रोलच आलेले नाही. त्यामुळे आपण पेट्रोल भरले नसेल तर आजच भरा. पैसे देऊनही भारत पेट्रोलियममधून पेट्रोल मिळत नाही. पेट्रोलचा तुटवडा खूपच जाणवत आहे अशी खंत फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, भारत पेट्रोलियमने गेले २ दिवस जवळपास सर्वच पंपामध्ये इंधन पुरवठा बंद केला आहे. दोन कंपन्या आणि भारत पेट्रोलियमनेही अचानक पेमेंट्सच्या शर्ती बदलल्या, पूर्वी सकाळी माल दिला तर संध्याकाळपर्यंत पैसे देऊन चालायचे, परंतु आता आदल्या दिवशी पैसे मागताहेत त्यामुळे पैशाची साखळीही बिघडली आहे. अॅडव्हान्स पैसे देणे शक्य नाही. मात्र पैसे देऊनही भारत पेट्रोलियममध्ये माल मिळत नाही, अशी परिस्थिती गेले २ दिवस आहे.