जगभरात मंकीपॉक्स व्हायरसचा धोका वाढत आहे. यामुळे भारतातही विशेष खबरदारी घेतली जात आहे. मंकीपॉक्स हा व्हायरस लहान मुलांकरता अतिशय धोकादायक ठरत आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस लहान मुलांबाबत अधिक संवेदनशील आहे. त्यामुळे लहान मुलांचा या व्हायरसपासून बचाव करणे जरुरीचे आहे.
आयसीएमआरने सांगितल्याप्रमाणे, भारत या संक्रमणाशी लढण्यासाठी तयार आहे. युरोप, अमेरिका आणि इतर लगतच्या देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचे संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अद्याप भारतात मंकीपॉक्स व्हायरसचा एकही रूग्ण सापडलेला नसला तरी पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. लहान मुलांच्या आरोग्याकडे अधिक बारकाईने पाहायला हवं. त्यांचा दिनक्रम आणि शरीरात घडून येणारे बदल यांकडे लक्ष द्यायला हवे.
आयसीएमआरने परदेशातून येणाऱ्या लोकांच्या प्रवासावर करडी नजर ठेवली आहे. ज्या देशात मंकीपॉक्सचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अशा परदेशातून येणाऱ्या प्रत्येकानेच स्वतःची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या लोकांमध्ये लक्षणे आढळल्यास सरकार तात्काळ त्यांना चाचणी करण्याचा सल्ला देत आहे.
आयसीएमआरचे शास्त्रज्ञ म्हणतात की, आम्हाला मंकीपॉक्सची असामान्य लक्षणे आढळून आली आहेत. ज्यामध्ये उच्च ताप, एकाधिक लिम्फॅडेनोपॅथी, लिम्फ नोड वाढणे, शरीरात दुखणे, पुरळ यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. ही लक्षणे विशेषतः संक्रमित देशांमधून प्रवास करणाऱ्या लोकांमध्येच दिसून येत आहेत.
जर एखादी व्यक्ती मंकीपॉक्सचा धोका असलेल्या देशांमध्ये प्रवास करून परतली असेल तर त्यांनी त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे हा विषाणू सामान्यतः तेव्हाच पसरतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी अगदी जवळच्या संपर्कात असतो. त्यामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या फार संपर्कात जाणं टाळा.