चिपळूण शहरातील जुना बाजारपूल अखेर जमिनदोस्त झाला. ६१ वर्षापूर्वीचा बहुचर्चेत असलेला पूल नजरेआड गेला. संबंधित ठेकेदाराने मोठी यंत्रणा कामाला लावून ८ दिवसामध्ये हा पूल जमिनदोस्त केला. १९६१ ला उभारण्यात आलेल्या पुलाबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या गेल्या. कमी उंचीच्या या पुलामुळे पाण्याचा फुगवटा मारून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरायचे. दरवर्षीची ही अवस्था होती. वाशिष्ठी नदीचे पाणी पूल अडवत असून त्यामुळे पुराचे पाणी शहरातील काही भागात घुसते, असे अनुमान काढण्यात आल्याने हा पूल तोडण्याचे आदेश देण्यात आले.
चिपळूण शहर व पेठमाप भागाला जोडण्यासाठी पालिकेने १९६१ ला वाशिष्ठी नदीवर हा पूल उभारला होता. या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी वाशिष्ठी नदीचे पाणी पुलावरून वाहून जायचे. नाईक कंपनीचा परिसर दरवर्षी पाण्याखाली असायचा.
२००५ च्या महापुरात हा पूल धोकादायक झाला. त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा आंदोलन झाले. जुलै २०२२ मध्ये आलेल्या महापुरानंतर झालेल्या सर्वेक्षणात हा पूल वाशिष्ठी नदीचे पाणी अडवत असून त्यामुळे पुराचे पाणी शहरातील काही भागात घुसते, असे अनुमान काढण्यात आले.
हा धोका कमी करण्यासाठी पूल तोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पालिकेला दिले. त्यामुळे नजीकच नवा पूल असल्याने हा पूल तोडण्याची कार्यवाही वेगाने केली. सध्या गॅस कटरच्या सहाय्याने त्यातील वापरलेले लोखंड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन नदीत पडलेले इतर साहित्यही पात्राबाहेर घेतले जाणार आहे. किमान पाच ते सहा टन लोखंड काढून ते पालिकेत जमा केले जाणार आहे. नवीन बाजारपूल झाल्यानंतर जुन्या बाजार पुलावरून पादचाऱ्यांची वाहतूक सुरू होती; मात्र हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.