जिल्ह्यातील प्रमुख चार शहरांमध्ये एका पाठोपाठ एक छोट्या मोठ्या चोऱ्या करून नागरिक आणि पोलिसांची झोप उडविणाऱ्या सात संशयित चोरट्यांना गुजरात येथे चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या संशयितांना आज वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरात येथे चोरी करताना सात संशयित चोरट्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली होती. सिंधुदुर्गात झालेल्या चोऱ्यांची पध्दत आणि गुजरात येथील झालेली चोरी यामध्ये साम्य आढळून आल्याने वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सूरज पाटील, काँन्स्टेबल राहुल तळसकर, कृष्णात पडवळ, सूरज पाटील, सुधीर तांबे या वैभववाडीच्या पथकाने गुजरात येथील वलसाडमधील नवसाली जेलमधून संशयितांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेले सातही संशयित चोरटे मध्य प्रदेशातील आहेत. यामध्ये रघुनाथ तेलसिंग मेहदा वय ५०, कमलसिंग रतनसिंग मेहडा वय ३५, मोरसिंग दीपकलाल बामण्या वय ४०, बिशण मंगू मेहता वय ४५, प्यारसिंग डोंगर सिंग अलावा वय ४०, समर सिंग ऊर्फ सम्राट भंगू मेहढा वय ४०, मोहब्बत मानसिंग मेहढा वय १९ यांचा समावेश आहे.
१६ एप्रिलच्या पहाटे चारच्या सुमारास वैभववाडी बाजारपेठेतील बाजूबाजूची सहा दुकाने चोरट्यांनी फोडली होती. त्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांनी तळेरे बाजारपेठेतील दहा दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हानच उभे केले होते. त्यानंतर कणकवली आणि फोंडाघाट येथील पाच-सहा दुकाने फोडून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केली होती. तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले होते. त्या आधारे पोलिस तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकच व्यक्ती प्रामुख्याने दिसत होती. अन्य चोरटे तोंडाला रुमाल बांधून होते. तरीदेखील पोलिस विविध माध्यमांचा वापर करीत तपास सुरु ठेवला होता. अखेर चोरटे ताब्यात सापडले असून, चोरलेला मुद्देमाल परत मिळवणे हे कठीण जाणार आहे.