कोकणातील तरुणांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची क्षमता निश्चितच आहे; परंतु या परीक्षेसाठी त्यांना प्रेरणा मिळेल असे वातावरण कोकणात निर्माण होणे आवश्यक आहे. देशातील उर्वरित भागात तेथील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरणे असल्याने ते विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीमध्ये पुढे राहतात. कोकणातील विद्यार्थ्यांना या परीक्षांबाबत सखोल माहिती देणे, मार्गदर्शन करणे ही जबाबदारी आगामी काळात आम्ही उचलणार आहोत, असे प्रतिपादन नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अक्षय महाडीक यांने केले.
अक्षय महाडीक यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात २१२ क्रमांक पटकावला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देशभरामध्ये १९ सेवाक्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते. आयोगामार्फत भारतीय पोलिस सेवेसाठी अक्षय यांची निवड झाली असून, मसुरी येथे लवकरच त्याचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. ज्या प्रकारे या परीक्षेसाठी माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच मला मार्गदर्शन व दिशा दिली, त्या प्रमाणेच आगामी कालावधीत प्रत्येक शाळेत जाऊन कोकणातील विद्यार्थ्यांना या परीक्षेविषयी माहिती पुरवणार आहे.
कोकणाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन भविष्यात येथून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल यासाठी मी विशेष प्रयत्नशील राहणार आहे. अक्षय म्हणतो, ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षण, आरोग्य व तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याबाबत मी प्रयत्न करणार आहे. लोकाभिमुख काम करणे हे माझे आद्य कर्तव्य राहील,असे त्याने सांगितले.
अक्षय महाडीकचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सेमी इंग्रजी माध्यमातून झाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करण्याविषयी तो म्हणाला, व्यापक क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा असल्यानेच याकडे वळलो. अशी संधी केंद्रीय लोकसेवा आयोग उपलब्ध करून देते. प्राथमिक तीन वर्षामध्ये मी सरासरी आठ तास दररोज अभ्यास करण्यासाठी वेळ दिल्यानेच मी हे यश मिळवू शकलो.