गेल्या काही दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामुळे रखडलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर राज्यात दमदार प्रवेश घेतला आहे. हा पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हमावान खात्याने दि. १० जून पासून हा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली असून लवकरच हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
हवामान खात्याच्या अनुमानानुसार पावसाने गोव्याची हद्द ओलांडून दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत प्रवेश केला आहे. या मुळे येत्या काही दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल संध्याकाळपासूनच रत्नागिरी, खेड, चिपळूण येथे धुवांधार पावसाला सुरुवात झाली आहे.
मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रातून येणा-या बाष्पामुळे आठवड्याच्या अवधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने हा पाऊस पुढे सरकू शकला नाही. ३१ मे रोजी मोसमी पाऊस हा कर्नाटकच्या कारवारच्या सिमेपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर त्याचा अरबी समुद्राच्या दिशेने मोसमी पावसाचा प्रवास रखडला.
परंतु, आत्ता या पावसासाठी चांगले वातावरण तयार झाले असून, लवकरच मोसमी पावसाचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. मोसमी पावसाने कर्नाटकचा बहुतांशी भाग व्यापून गोव्यात प्रवेश केला. असून आता दक्षिण कोकणाची सीमा ओलांडून पाऊस सिंधुदुर्गात पोहोचला असून, संध्याकाळी पुढे सरकत कोकणात विजा आणि गडगडाटासह पावसाची तुफानी खेळी सुरु केली आहे. त्यामुळे शेतीची पूर्वतयारी करून पावसाची वाट बघत असलेला शेतकरी सुखावला आहे.