नवीन शैक्षणिक वर्ष आज पासून सुरु होत आहे. त्यामुळे काही जणांच्या शाळा १ जून पासून सुरु झाल्या तर काही शाळा ६, १३ आणि १५ जून पासून सुरु होणार आहेत. पालकांची देखील सर्व लगबग सुरु आहे. परंतु, शाळेच्या पहिल्या दिवशीच पालकांना मोठा फटका बसणार आहे. स्कुल बस संघटनेने याबद्दलचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय साहित्याच्या किमतीतही वाढ झाली होती. त्या पाठोपाठ आता स्कूल बसचे दरही वाढवण्यात येणार आहेत.
आजपासून राज्यातल्या बहुतांशी शाळा सुरू होत आहेत. आजपासूनच स्कूल बस संघटनेने स्कूल बसच्या दरात २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंधन दर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेनी म्हटल आहे. दरामध्ये साधारण ४०० ते ५०० रुपयांची दरवाढ केली जाणार आहे. ३० टक्के दरवाढीची मागणी संघटनेने केली होती. मात्र पालकांच्या देखील अडचणी लक्षात घेता ती दरवाढ २०% एवढी केली आहे.
दोन वर्षांपासून कोरोना काळामध्ये शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांचे घरुनच शिक्षण सुरु होते. मात्र आता शाळा नियमित सुरू झाल्याने पालकांना स्कूल बसचा खर्च करावा लागणार आहे. स्कूल बस चालकांचे उत्पन्न देखील त्यामुळे बंद झालेले. बँका व फायनान्स कंपनीचे हप्ते थकले, त्यामुळे वाहन जप्त झाले. तर काही चालकांनी आपले वाहन विकून दुसरा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं स्कूल बस बोनस असोसिएशनने सांगितलं आहे.
शाळेत जाणाऱ्या एकूण वाहतुकीपैकी सुमारे ८० टक्के वाहतूक ही खासगी आहे. यामध्ये रिक्षा, स्कूल बस, व्हॅनच्या माध्यमातून वाहतूक केली जाते, तर शाळेच्या स्वतःच्या आठ ते दहा टक्के बस आहेत. शिवाय, १० टक्के पालक आपल्या पाल्यांना शाळेत स्वतः सोडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणांत वाहतूक ही खासगी वाहनाद्वारे होते. दोन वर्षे स्कूल बस बंद असल्याने आता ती सुरू करण्यासाठी किमान ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात त्यांच्या देखभालीपासून ते विम्याचे हप्ते, आरटीओ पासिंग आदींचा खर्चदेखील करावा लागणार आहे.

