कोकण रेल्वेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांना याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे.
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि अन्य अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटी वेळी आमदार राणे यांनी कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्गातील समस्यांबाबतच निवेदन श्री.गुप्ता यांना दिले. या निवेदनात कोकण रेल्वे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या व त्या भूमिपुत्रांना अद्याप कोकण रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, त्यांच्या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
त्याचप्रमाणे, दादर स्थानकातून सुटणाऱ्या तुतारी एक्सप्रेसच्या वेळेत बदल व्हावा. कणकवली तालुक्यातील तिवरे येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल व्हावा. तुतारी एक्स्प्रेसला नांदगाव येथे थांबा द्यावा. दादर वसई मार्गे सावंतवाडी अशी पॅसेंजर गाडी सायंकाळी सोडण्यात यावी. दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा पूर्वी प्रमाणेच दादरहून सोडण्यात यावी जि सध्या दिव्यावरून सोडण्यात येत आहे तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डबे पूर्ववत करावेत, अशी मागणी मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्या कोकणवासीय प्रवासी जनतेकडून करण्यात आली आहे. नेत्रावती एक्स्प्रेस गाडीला कणकवली येथे थांबा द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
कोरोनानंतर सर्व गाड्या पूर्ववत झाल्यानंतरही कोकण रेल्वेने वरील सुविधा अद्याप पूर्ववत केलेल्या नाहीत. गेल्या सात वर्षांपासून सुरू झालेल्या कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता या मार्गावरील रेल्वे प्रवासही प्रदूषण मुक्त होणार आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे.