गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अखेर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाने राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनेही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी यावर चर्चा करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजन साळवी यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास काहीच वेळ शिल्लक असतानाच मविआ नेत्यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने राहुल नार्वेकर यांचे नाव पुढे करत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिवसेनेनेही नार्वेकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्यासाठी पावले उचलली. तसेच या उमेदवारीसाठी शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसत होतं. अखेरीस महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राजापूर मतदारसंघातून राजन साळवी यांनी शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी देखील निवड झाली होती. आता होणाऱ्या निवडणुकीत राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. यावेळी विकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील ,काँग्रेसचे बाळासाहेब थोरात शिवसेनेचे अरविंद सावंत व महा विकास आघाडीचे नेते उपस्थित होते. राजन साळवी हे कडवे व निष्ठावंत शिवसैनिक असल्याने त्यांची या उमेदवारीसाठी निवड करण्यात आली आहे.