गुहागर तालुक्यात वेळणेश्वर भाटी येथे एका पंधरा वर्षाच्या मुलाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने शाळेत न जाण्यावरुन वडील रागावले म्हणून त्याचा राग मनात धरून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. पारस विकास पालशेतकर वय १५ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओरडल्यानंतर रुसलेल्या पारसची समजूत काढण्यासाठी वडील गेले असता, समोरचे दृश्य बघून त्यांना प्रचंड धक्काच बसला.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्र्वर मध्ये पारस इयत्ता ९ वीत शिकत होता. त्याने माळ्यावरील खोलीमध्ये लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला होता. वडिलांनी तात्काळ दोरीच्या विळख्यांमधून पारसला सोडवले आणि उपचाराकरिता हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून गेले. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याची प्राण ज्योत मालवली होती. या सगळ्या प्रकाराने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
गुहागर पोलीस ठाण्यात विकास भाग्या पालशेतकर वय, ४८, रा. वेळणेश्वर भाटी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांचा मुलगा पारस शाळेत जाण्यास तयार नव्हता. मी शाळेत जाणार नाही. मला शिकायचे नाही असे त्याचे म्हणणे होते. या मुद्द्यावर वडील विकास पालशेतकर हे पारसला रागावले. त्याचा राग मनात ठेऊन पारस घराच्या माळावरील एका खोलीमध्ये जावून बसला. रुसलेला पारस थोड्यावेळाने खाली येईल, असे समजून घराच्यांनी लक्ष दिले नाही. पण बराच वेळ झाला तरी पारस माळ्यावरुन खाली आला नाही, म्हणून समजूत काढून त्याला परत बोलवण्यासाठी वडिल गेले, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.
हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर या मुलाचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी सहकाऱ्यांसह हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून पंचनामा आदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करुन पारसचा मृतदेह पालशेतकर कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात पारसवर अंत्यसंस्कार करण्यात आले.