गेले चार पाच दिवस कोकणात पावसाची जोरदार सुरूवात झाली असून, दरडींच्या भीतीमुळे वरंध घाटरस्ता बंद करण्याची वेळ आली आहे. तर महाड तालुक्यात बावणे गावात वस्तीपासून अर्ध्या किलोमीटरवर अंतरावर डोंगरावर मोठी शंभर मीटर लांब भेग पडली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली असून सर्व गाव भीतीच्या छायेखाली असून, याबाबतचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या पायथ्याजवळ हे गाव असून महाड शहरापासून अंदाजे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर हे गाव स्थित आहे. डोंगरावरची भेग हि साधारण आठ ते दहा फूट खोल असावी असा अंदाज आहे. महाड तहसीलदार सुरेश शिद यांना हा प्रकार शुक्रवारी लक्षात येताच त्यांनी गावात जाऊन घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांना सुरक्षा उपाय म्हणून जवळपास नातेवाईक किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळी महसुल प्रशासन त्या गावात दाखल झाले असून जवळपास १२० ते १४० लोकांना कुटुंबासह स्थलांतरित होण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वस्ती पासून भेग पडलेला हा भाग जवळच असल्याने याची व्याप्ती भविष्यात वाढण्याचा धोका नाकारता येत नाही म्हणूनच प्रशासन सावध झाले आहे. ग्रामस्थांना सुरक्षेच्या दृष्टीने हलवण्याची तयारी सुरू झाली आहे.
प्रशासनाकडून जवळच्या गावात मंदिर, समाजमंदीर इथे ग्रामस्थांना सुरक्षितता म्हणून हलवण्यासाठी तयारी सुरू आहे. पण या गाववस्तीला कोणताही धोका बसणार नाही असे प्रशासनाचे मत असले तरी सावधगिरी सुरक्षितता म्हणून या हालचाली सुरू झाल्या आहेत.

