सातबारा दुरुस्ती आणि खरेदी करण्यात आलेल्या भूखंडाच्या सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्यासाठी ३१ हजाराची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला (सर्कल) रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवारी १९ एप्रिलला रात्री उशिरा शहराजवळील खेडशी येथे ही कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकाऱ्याला ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुशांत शेलार यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, अमित जगन्नाथ चिपरीकर (वय ३९, मंडळ अधिकारी, खेडशी) असे संशयित लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे पक्षकार यांच्या नावावर असलेला सातबारा दुरुस्ती करण्यासाठी १० हजार लाच मागितली तर इतर पक्षकार यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्यासाठी २१ हजार असे एकूण ४२ हजार रुपये लाच मागितली होती. त्यापैकी ३१ हजाराची लाच पहिल्या टप्प्यात देण्याचे निश्चित झाले. याची तक्रार संबंधितांनी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्याची खात्री करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण, हवालदार विशाल नलावडे, पोलिसनाईक दीपक आंबेकर, कॉन्स्टेबल हेमंत पवार, वैशाली धनावडे यांच्या पथकाने सापळा रचला आणि लाच घेताना अमित चिपरीकर यांना रंगेहाथ पकडेल.चिपरीकर यांच्याबद्दल अनेक तक्रारी असल्याचे आता ग्रामस्थ सांगत आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून, सायंकाळी न्यायालयासमोर हजर केले असता १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.