गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील ३ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणप्रकरणी ३ संस्थाचालकांना अटक करण्यात आली असून त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, गुहागरम ध्ये शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन प्राध्यापक संघटनेच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले. या मोर्चात प्राध्यापकांसह काही विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. गुहागर येथील प्राध्यापक मारहाण प्रकरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. संस्थाचालकांनी केलेल्या या मारहाणीने संताप व्यक्त होत आहे.
येथील संस्थेच्या कार्यपध्दतीसह कारभारावरच संशय व्यक्त करण्यात येत आहे. मारहाणप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करुन ३ संस्थाचालकांना अटक केली. या तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, बुक्टू संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासह महाराष्ट्रातून आलेल्या प्राध्यापकांनी या मोर्चात सहभागी होऊन या घटनेचा निषेध केला. विशेष म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थीही या मोर्चात सहभागी झाले होते. हे विद्यार्थी शिक्षक वाचवा, प्राध्यापक वाचवा अशा घोषणा देत कारवाईच्या मागणीचे फलक दर्शवित होते. गुहागरातील शिवाजी चौक ते पोलीस ठाणे असा हा मोर्चा काढण्यात आला. मारहाण झालेल्या प्राध्यापकांचे कुटुंबियही या मोर्चात सहभागी होते. मोर्चानंतर झालेल्या सभेत बुक्टू संघटनेचे पदाधिकारी व जिल्हाभरातून आलेल्या प्राध्यापकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.