रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जोरदार खलबते सुरू आहेत. पक्षातील निष्ठावंतांनाच उमेदवारी मिळावी यावर शिवसैनिक ठाम आहेत. त्यामुळे ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारीची चाचपणी करणारे भाजपचे माजी आमदार बाळ माने बॅकफूटवर गेले आहेत. मानेंनी अपक्ष लढण्याच्यादृष्टीने हालचाल सुरू केली आहे. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचे हे पाचवे पर्व आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असताना २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढून दोनवेळा ते आमदार झाले; परंतु आता तालुक्यात मजबूत असलेल्या शिवसेनेत फूट पडली आहे. या फुटीनंतर शिंदे गटातर्फे शिवसेनेतून पहिल्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. ते महायुतीचे उमेदवार असले तरी भाजपतील बाळ माने गटाचा त्यांना पराकोटीचा विरोध आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये भाजप आणि शिवसेनेतील संबंध अधिक दृढ होण्यासारखेही काही घडलेले नाही. बाळ माने निवडणूक लढण्याच्या उद्देशानेच दोन वर्षे मतदारसंघात राबत आहेत. महायुतीमुळे त्यांची ही संधी जाण्याच्या शक्यतेने त्यांनी बी प्लॅन तयार ठेवला. ठाकरे शिवसेनेतून उमेदवारी मिळवून उदय सामंत यांच्या विरोधात लढण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे.
त्याबाबत त्यांनी एका पत्रकार परिषदेतदेखील संकेत दिले; मात्र याला ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी विरोध केला. हा विरोध ठाम असल्याने बाळ मानेंना यश येण्याची शक्यता नाही. ठाकरे शिवसेनेकडून इच्छुक उदय बने, राजू महाडिक आणि बाळ माने यांची बंद दरवाजाआड चर्चा, अशी वृत्ते प्रसिद्ध झाल्यावर ठाकरे गटाचे इच्छुक आणखी संतापले. बाळ माने आणि आमच्यात बंद दरवाजाआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचे इच्छुक उमेवदार राजेंद्र महाडिक यांनी स्पष्ट केले; परंतु माने अजूनही मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.