HomeChiplunमित्र-मैत्रिणीमध्ये झालेले कडाक्याचे भांडण विकोपाला पोहोचले आणि ५ जणांचा जीव घेऊन गेले!

मित्र-मैत्रिणीमध्ये झालेले कडाक्याचे भांडण विकोपाला पोहोचले आणि ५ जणांचा जीव घेऊन गेले!

वाऱ्याच्या वेगाने जाणारी थार रिक्षावर जाऊन आदळली.

चिपळूण-कराड मार्गावर सोमवारी रात्री उशीरा भीषण अपघात झाला. थार गाडीतून जाणाऱ्या मित्र आणि मैत्रिणीचे भांडण अचानक विकोपाला गेले. वाऱ्याच्या वेगाने जाणारी थार गाडी कुठेतरी आदळणार या भीतीपोटी जीवाच्या आकांताने ‘वाचवा वाचवा’ असे ओरडत एक तरूणी या गाडीतून खेर्डीमध्ये उतरली आणि थार गाडी घेऊन तिचा मित्र सुसाट निघून गेला. पुढे तो वेगाच्या भरात एका रिक्षावर जाऊन आदळला. या अपघाताने एकाच कुटुंबातील ४ जणांचा जीव घेऊन त्याने स्वतःचाही नाहक जीव घालवला. चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात. एकूण ५ जणांचा मृत्यू ओढवला असून यामध्ये एका ४ वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. चिपळूण-कराड मार्गावर सोमवारी रात्री ११ वा. च्या सुमारास हा अपघात झाला. सुसाट धावणाऱ्या थार गाडीने रिक्षाला धडक दिली. तसेच मागून येणाऱ्या ट्रक व थार यांच्यामध्ये रिक्षा सापडली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. मंगळवारी सकाळी या भीषण अपघातांचे वृत्त कळताच सर्वत्र खळबळ उडाली. चिपळुणात दिवसभर पिंपळीमध्ये झालेल्या या अपघाताची चर्चा सुरू होती. काय घडले आणि कसे घडले? याची कहाणी अनेकांमध्ये चर्चिली जात होती.

डेहराडूनचे मित्र-मैत्रिण – या अपघाताविषयी अधिक वृत्त असे की, उत्तराखंडमधील डेहराडून येथील असिफ हकीमुद्दीन सैफ (वय २८) आणि त्याची मैत्रीण सुनीता हे दोघे गोवा येथे फिरण्यासाठी आले होते. तेथून ते चिपळूणला सोमवारी रात्री आले. हॉटेलमध्ये जेवून पुन्हा कराडच्या दिशेने निघणार होते. काही दिवस ते गोवा आणि कोकण या भागात फिरत होते.

दोघांमध्ये वाद – असिफ आणि सुनीता यांचे काहीतरी सोमवारी बिनसले असावे. दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू होते. अचानक हे वाद टोकाला गेले. थार गाडीमध्येच जोराजोरात वाद होऊ लागले. थार गाडी वेगात पळत होती. खेर्डीच्या दिशेने ती निघाली असता अचानक या वेगामुळे काही तरी घडणार, हे ओळखून सुनीता हिने ‘वाचवा वाचवा’ असा जोरदार टाहो फोडला. त्यामुळे तिला खेर्डी येथे उतरवून असिफ थार घेऊन सुसाट वेगाने निघून गेला.

पुन्हा आरडाओरडा – सुनीता थार गाडीमधून उतरली आणि आपली गाडी चोरून नेली असल्याचा आरडाओरडा करू लागली त्याचा पाठलाग करा, असेही जोरजोरात सांगू लागली. ते ऐकून एक कारचालक मदतीला आला. त्याने त्या तरुणीला गाडीत घेऊन तिच्या मित्राच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. मात्र प्रत्यक्षात कारचालकाने त्या तरुणीला पोलीस स्थानकात घेऊन जाण्याचे ठरविले. तसे त्याने तिला सांगितले. पोलिसांचे नाव घेताच ती तरुणी घाबरली आणि गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे कारचालकाने गाडी थांबवून तिला बहादूरशेख नाका येथे उतरविले.

…. आणि मोठा अपघात घडला – सुनीता हिच्या मालकीची थार घेऊन सुसाट वेगाने असिफ कराडच्या दिशेने निघाला होता. वाऱ्याच्या वेगाने जाणारी थार रिक्षावर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की, थारने रिक्षाला ओढत नेत समोरून येणाऱ्या ट्रकवर येऊन आदळला. यामध्ये रिक्षा आणि थार यांचा चक्काचूर झाला आहे.

पुण्यातील कुटुंब – दरम्यान निजाम महंमद हुसेन सय्यद (वय ५०), शबाना नियाज सय्यद व हैदर नियाज सय्यद (वय ४ वर्ष, सर्व राहणार पर्वती, पुणे) हे पिंपळी येथे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलाला भेटायला आले होते. त्यांची भेट झाल्यानंतर ते सर्व पुण्याला जाण्यासाठी चिपळूण रेल्वे स्थानकाकडे रिक्षाने निघाले होते.

रिक्षाने रेल्वेस्टेशनकडे – पिंपळी नूराणी मोहल्ला येथे राहणारे रिक्षाचालक इब्राहिम इस्माईल लोने (वय ६२) हे या तिघांना घेऊन निघाले होते. वाशिष्ठी डेअरीसमोर येणाऱ्या रिक्षाला थार कारची धडक बसली. त्यामुळे ही रिक्षा ट्रकवर आदळली. यामध्ये ५ जण जागीच ठार झाले.

प्रचंड गर्दी – अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले आणि अपघातस्थळी मध्यरात्री प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही बाजूने ट्राफिक जाम झाले होते. एकच गोंधळ या ठिकाणी सुरू होता. ५ जणांना शवविच्छेदन करण्यासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आंले होते.

गुन्हा दाखल – दरम्यान या अपघाताविषयी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी बेले, पो. नी. फुलचंद मेंगडे दाखल झाले होते. तर या संदर्भात सहायक पो. नी. विकास निकम हे तपास करीत असून त्यांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular