HomeRatnagiri४० फूट खोल नाल्यात मोटार कोसळल्याने, डॉक्टर दांपत्य गंभीर जखमी

४० फूट खोल नाल्यात मोटार कोसळल्याने, डॉक्टर दांपत्य गंभीर जखमी

डॉ. आनंद चंद्रशेखर पोळ, डॉ. समीक्षा आनंद पोळ रा. दोघेही रत्नागिरी असे गंभीर जखमी झालेल्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची नावे आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील आगवे येथे पुलावरून ४० फूट खोल नाल्यात मोटार कोसळून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर दांपत्यासह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास  घडली. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील दोघे पती-पत्नी डॉक्टरांसह एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था सर्वज्ञातच आहे. एकतर न संपणारे रस्त्याचे काम, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यातच भर म्हणून सावर्डे ते कामथे दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, काँक्रिटीकरणालाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने यावर तातडीने उपाय करण्याची मागणी करण्यात येत आहे.

डॉ. आनंद चंद्रशेखर पोळ, डॉ. समीक्षा आनंद पोळ रा. दोघेही रत्नागिरी असे गंभीर जखमी झालेल्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची नावे आहेत. ते रत्नागिरीहून कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांगाच्या शिबिरासाठी जात होते. सावर्डे पासून काही अंतरावर आगवे पुलाच्या ठिकाणी महामार्गाचा काही भाग उंच सखल असल्याने पोळ यांचा मोटारीवरील ताबा सुटला आणि त्यांच्या मोटारीची धडक समोरून येणाऱ्या दुचाकीस्वराला बसली. पण ती धडक बसू नये म्हणून दुचाकीस्वाराला वाचवताना ही मोटार रस्ता सोडून नजीकच्या ४० फूट खोल नाल्यामध्ये कोसळली. या अपघातात डॉ. समीक्षा पोळ व आनंद पोळ जबर जखमी झाले.

स्थानिकांनी अपघात स्थळी जाऊन दोघांना तत्काळ बाहेर काढून नजीकच्या डेरवण रुग्णालयात दाखल केले. दुचाकीस्वाराला देखील गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावरही त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घटनस्थळी पोहोचले होते. या अपघातानंतर तत्काळ घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेटस उभारून तो परिसर सील केला. आगवे पुलाच्या ठिकाणी एकेरी वाहतूक ठेवली होती. या घटनेमुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडीही झाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular