रत्नागिरी आणि कोल्हापूर महामार्गावर लागणाऱ्या आंबा घाटामध्ये डोंगरावरून पुन्हा माती आणि दगड कोसळून रस्त्यावर आले आहेत. महामार्गावर लहान वाहनांची वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा दरड कोसळल्याने काही काळ दुतर्फा वाहतूक बंद करणार ठेवण्यात आली होती.
२२ जुलै च्या दरम्यान झालेल्या अती पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली, महामार्गांची अवस्था सुद्धा अतिशय वाईट झाली होती. आंबा घाटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्ता खचला होता, त्याचप्रमाणे आंबा घाटातून होणारी वाहतूक जवळपास २० दिवसांपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्या काळामध्ये रस्त्यांचे डागडुजी ची कामे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणी संपूर्ण नवीन रस्ता बनवण्याचे काम वेगवान गतीने करणे सुरु होते. त्या काळात सुद्धा कमी अधिक प्रमाणात डोंगरावरून माती आणि दगड खाली येण्याचे सुरुच होते, त्यामुळे रस्त्यांची कामे करण्यास सुद्धा अनेक अडचणी निर्माण होत होत्या.
रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर साधारण आठवडाभरापूर्वी आंबा घाटातील हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली, परंतु शनिवारी पुन्हा एकदा रस्त्यावर दरड कोसळण्याचे सुरू झाल्याने तात्काळ वाहतूक थांबवण्यात आली. प्रशासनाने काही कालावधीमध्येच दरड महामार्गावरून हटवली आणि तब्बल दोन तासाने मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे वारंवार अती प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे, जमीन भुसभुशीत होऊन दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ते, महामार्ग, पूल, शेती, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.