कोकणाला नैसर्गिक सौंदर्याची भरभरून देणगी मिळालेली आहे आणि त्याच्या विकासासाठी रत्नागिरी मध्ये देखील मोठ्मोठे आणि पर्यटकांना आकर्षित करणारे प्रकल्प उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रत्नागिरीला लाभलेला स्वच्छ आणि सुंदर किनारा हे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
आरेवारे येथील ओशनफ्लाय झिपलाइने या दिव्यांगांना मोफत झिपलाईनचा आनंद अनुभवायला दिला. रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन आणि ओशनफ्लाय झिपलाईन यांच्या सहयोगाने दिव्यांगांनी जागतिक पर्यटनदिन अनोख्या रितीने साजरा केला. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांना खूप दिवसांपासून आपल्या दिव्यांग बाधवांनाही आरेवारेचा अथांग समुद्र न्याहाळत झिपलाइनची संधी द्यायची होती. अनेक दिवस त्यांच्या मनात हा विचार घोळत होता. मग त्यांनी पर्यटनदिनाचे औचित्य साधून ओशन फ्लाय झिपलाइनच्या गणेश चौघुले यांच्याशी संपर्क साधला. चौघुले यांनी आरएचपीच्या दिव्यांग सदस्यांना मोफत झिप लाईनची सैर घडवली.
झिपलाईन म्हणजे आरेवारेच्या एका टेकडीवर बांधलेल्या १३०० फूट लांबीच्या दोन वायर रोपवरून सुरक्षितरित्या लोंबकळत किनाऱ्यावर जाणे. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेऊनच रोपवरून सैर घडवली जाते. ओशन फ्लाय झिपलाईनचे गणेश चौघुले यांनी आपला अमुल्य वेळ दिव्यांगांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिला. त्यांचे सहकारी राजेश मोहिते, सूरज चव्हाण, सूरज मयेकर, विजय शिवलकर, विधी शिवलकर यांनी दिव्यांगांना रोपवेवर चढवणे, उतरवण्यासाठी खूप मदत केली.
दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता येत नाही. अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगावे लागते. समुद्रसफर, भटकंती, धाडसी खेळ यांच्या आनंदापासून सुद्धा त्यांना वंचित राहावे लागते. अशा दिव्यांग व्यक्तींसाठी जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून आरेवारे येथे झिपलाईनचा आनंद लुटण्याची संधी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने उपलब्ध करून दिली. यामुळे दिव्यांगांच्या मनातील भीती तर गेलीच आणि त्यांच्या चेहऱ्यावरील द्विगुणीत झालेला आनंद पाहून साऱ्यांचा उत्साह वाढला. खर्या अर्थाने पर्यटनदिन साजरा झाल्याचे समाधान सर्वांना लाभले.

